पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल 3 कोटी 78 लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल…


लोणी काळभोर : पुणे मेट्रो या प्रकल्पासाठी सिमेंट व स्टील पुरवठा केली तर मोठा नफा व परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका दाम्पत्याची तब्बल 3 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी याप्रकरणी प्रिती विनोद जैन (वय 42, रा. कृषीतंत्र विद्यालय, मांजरी फार्म, मांजरी बुद्रुक, ता. हवेली.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी संतोष सुरेश काकडे (रा. राहींजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) व अतुल पवार (रा. खिलारवाडी, नळ स्टॉप, पुणे.) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रिती जैन या सन 2019 पासून कृषितंत्र विद्यालय मांजरी येथे कृषी सहाय्यक म्हणून काम करत आहेत. त्यांचे पती विनोद जैन यांची मावळ तालुक्यात वडिलोपार्जित शेती आहे. कोविड काळात प्रिती जैन यांना नोकरीनिमित्त मांजरी येथे ये-जा करावी लागत असल्याने त्यांचे पतीही त्यांच्यासोबत येत असत. याच काळात विनोद जैन यांची ओळख अतुल पवार याच्याशी झाली. पवार याचा पुणे–सोलापूर महामार्गावरील मांजरी येथे बिल्डिंग मटेरियल पुरवठ्याचा व्यवसाय होता. दुकानात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यावसायिकांमध्ये संतोष काकडे याचीही ओळख झाली. काकडे हा बिल्डिंग मटेरियल पुरवठादार असल्याचे सांगत होते.

एके दिवशी दुकानात चर्चा सुरू असताना संतोष काकडे याने विनोद जैन यांना आपण पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेंट व स्टीलचा पुरवठा करीत असल्याचे सांगितले. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे आमिष दाखवून य पवार याने जैन यांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला जैन दाम्पत्याने सावध पवित्रा घेतला होता. परंतु त्यानंतर काकडे याने कमी दरात सिमेंट पुरवठा करून काही व्यवहार व्यवस्थित पूर्ण केले.

त्यामुळे जैन यांचा त्याच्यावर विश्वास बसला. तसेच पवार हा सतत गुंतवणुकीसाठी जैन दाम्पत्याची मनधरणी करत होता. त्यानंतरच्या काळात जैन दाम्पत्य औंध येथे घर खरेदी करण्याच्या विचारात होते. परंतु पवार याने घर घेण्याऐवजी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला व याद्वारे तीन ते सात दिवसांत मोठा नफा मिळेल असे सांगून त्यांना पैसे गुताविण्यास प्रवृत्त केले.

जैन दाम्पत्याने काकडे याचे हडपसर येथील ‘संतोषी सप्लायर्स’ दुकान आणि लोणी काळभोर येथील त्याचे घराला भेट देऊन पाहणी केली. काकडे याने पुणे मेट्रो प्रकल्पावर काम करणाऱ्या नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत करार असल्याची कागदपत्रे त्यांना दाखवली. त्यामुळे जैन दाम्पत्याचा विश्वास अधिकच दृढ झाला.

त्यानंतर मोठा नफा मिळतो आहे हे लक्षात घेऊन 26 ऑगस्ट 2020 पासून जैन दाम्पत्याने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. हा व्यवहार अतुल पवारमार्फत करण्यात येत होता. पवार स्वतःच्या बँक खात्यातून ती रक्कम संतोष काकडे याला पाठवत होता. ऑगस्ट ते सप्टेंबर 2020 या कालावधीत जैन दाम्पत्याने विविध व्यवहारांतून 27 लाख 87 हजार 500 रुपये गुंतवले. या बदल्यात सुरुवातीला आरोपींनी सुमारे 4 लाख रुपयांचा नफा दिला. त्यामुळे जैन दाम्पत्याचा विश्वास बसला.

सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत त्यांनी 2 कोटी 54 लाख 95 हजार रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर 66 लाख रुपये नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अशा प्रकारे एकूण व्यवहार 3 कोटी 21 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला आरोपींनी जैन दाम्पत्याला 1 कोटी 55 लाख रुपये परत दिले. परंतु उर्वरित 1 कोटी 66 लाख रुपये देण्याबाबत टाळाटाळ सुरू केली. पैसे मागितल्यावर संतोष काकडे याने पुणे मेट्रो प्रकल्पातील कंत्राटदार नागार्जुन ग्रुपचे ऑडिट सुरू असल्याने पैसे अडकले आहेत, असे कारण सांगितले.

त्यामुळे सात दिवसांच्या ऐवजी पुढे महिन्याने पैसे देऊ असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर काकडे याने जैन दाम्पत्यासोबत 4 कोटी 11 लाख रुपयांचा करारनामा केला. कोरोना लॉकडाऊननंतर काही रक्कम देण्याचे आणि उर्वरित रक्कम तीन महिन्यांत देण्याचे आश्वासन त्यात देण्यात आले होते. परंतु मार्च 2021 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये केवळ 33 लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम मागितल्यावर त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तसेच जैन दाम्पत्यावर दबाव आणण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात सावकारीची खोटी तक्रार देण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

यामुळे आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येताच जैन दाम्पत्याने अखेर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संतोष सुरेश काकडे व अतुल पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!