16 ऑगस्टपासून गॅस सिलिंडर बंद होऊ शकतो? लाखो LPG ग्राहकांसाठी अलर्ट; तातडीने पूर्ण करा ‘हे’ काम


पुणे : देशभरातील कोट्यवधी एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची आणि तितकीच धोक्याची सूचना समोर आली आहे. गॅस कनेक्शनशी संबंधित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना 16 ऑगस्टनंतर गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या एलपीजी सबसिडीवरही गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसात गॅस एजन्सींसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

तेल विपणन कंपन्यांनी देशातील सर्व जुन्या एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबांनाही ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. शासनाच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, बनावट कनेक्शन रोखणे आणि सबसिडी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना सिलिंडर बुकिंग किंवा वितरणावेळी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक ग्राहक शेवटच्या क्षणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. ज्या ग्राहकांनी यापूर्वी ई-केवायसी केली आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांची पडताळणी प्रलंबित आहे, त्यांनी तातडीने ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

ग्राहकांना ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून ई-केवायसी करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि छायाचित्र सादर करून प्रक्रिया पूर्ण करता येते. तर ऑनलाइन पद्धतीने संबंधित गॅस कंपनीच्या मोबाईल अॅपवर फेस ऑथेंटिकेशनद्वारे काही मिनिटांत ई-केवायसी पूर्ण करता येते.

अनेक ठिकाणी सर्व्हरची समस्या आणि तांत्रिक अडचणींच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे एजन्सीकडून ग्राहकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 16 ऑगस्टनंतरही ई-केवायसी करता येणार असली, तरी पडताळणी पूर्ण होईपर्यंत गॅस सिलिंडर आणि सबसिडीचा लाभ थांबू शकतो.

त्यामुळे “नंतर करू” असा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा शेवटचा इशारा मानला जात आहे. घरगुती गॅसचा पुरवठा खंडित होऊ नये आणि सबसिडीचा लाभ कायम राहावा यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करणेच सर्वात सुरक्षित पर्याय ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!