पिंपरी चिंचवडसह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर, पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन…

पुणे : राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढला असून गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात एकूण ६५ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २५ रुग्ण आढळून आले असून, मुंबईत २२, ठाण्यात ९, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये २ आणि नागपूरमध्ये १ नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.
तसेच जानेवारीपासून १ जूनपर्यंत राज्यात ११,५०१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी ८१४ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ५०६ रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत, तर ३०० रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.
मात्र, यावर्षी आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये कर्करोग, मूत्रपिंडविकार, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह, फुफ्फुसविकार व इतर गंभीर आजार असलेले रुग्ण होते. मुंबईत सध्या एकूण ४६३ करोनाबाधित रुग्ण आहेत.
वाढत्या संक्रमणामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, विशेषतः श्वसनविकार असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण आणि त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
दरम्यान, सद्यस्थितीत बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असल्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि हात धुणे हे मूलभूत नियम पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.