विहिरीच्या पाण्यावरून वाद! शेतकर्याचा चाकूनेवार करून खून, जेजुरी येथील घटना..

पुरंदर : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील आंबळेजवळील जगतापवस्तीवर शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एका शेतकर्याचा चाकूने वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. १५ सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडल्याची माहिती जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली आहे.
या घटनेत अविनाश मल्हारी जगताप (वय.४०) यांचा खून झाला. याप्रकरणी संशयित बाळूदास काळूराम जगताप (वय. ५५, रा. आंबळे, ता. पुरंदर) यास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबळे हद्दीतील जगतापवस्ती येथे अविनाश मल्हारी जगताप यांची गट क्रमांक ८४८ मध्ये शेतजमीन आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास या शेतीतील विहिरीमधील पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन आरोपी बाळूदास याने चाकू काढून अविनाश यांच्यावर चार ते पाच वार केले. या हल्ल्यात अविनाश यांचा मृत्यू झाला.
या वेळी या ठिकाणी उपस्थित असणारे अविनाश जगताप यांचे वडील मल्हारी जगताप, गणेश जगताप यांच्यावर देखील संशयिताने चाकूने वार करून त्यांना जखमी केले, अशी फिर्याद सौरभ दत्तात्रय जगताप यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.