शेतकरी कर्जमाफीच्या यादीत गोंधळ! 2 लाखांऐवजी कमी रक्कम का दिसते? कृषीमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

मुंबई : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांच्या नावासमोर कर्जमाफीची रक्कम मूळ कर्जापेक्षा कमी दिसत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 16 लाख 96 हजार पात्र कर्ज खात्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यादीतील रक्कम आणि प्रत्यक्ष थकीत कर्ज यात फरक दिसत असल्याने अनेक शेतकरी संभ्रमात पडले होते.

याबाबत बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, हा फरक ‘हेअरकट’ (Haircut) सूत्रामुळे दिसत आहे. ही प्रक्रिया शेतकरी आणि बँकेदरम्यान नसून राज्य शासन आणि बँका यांच्यातील आर्थिक तडजोडीचा भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.


‘हेअरकट’ सूत्र काय?
या प्रक्रियेनुसार थकीत कर्जातील किती रक्कम सरकार देणार आणि किती हिस्सा बँकेने स्वीकारायचा, हे कर्ज किती वर्षांपासून थकीत आहे यावर ठरते.
1 वर्षापर्यंत थकीत कर्ज – सरकार 85%, बँक 15%
2 वर्षे थकीत कर्ज – सरकार 70%, बँक 30%
3 वर्षे थकीत कर्ज – सरकार 55%, बँक 45%
4 वर्षे थकीत कर्ज – सरकार 45%, बँक 55%
4 वर्षांपेक्षा अधिक थकीत कर्ज – सरकार 35%, बँक 65%
कर्जमाफीच्या यादीतील रकमेबाबत शंका किंवा तक्रार असल्यास संबंधित बँकांशी समन्वय साधून त्या तातडीने निकाली काढल्या जात असल्याचेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.