मुख्यमंत्र्यांची घोषणा ; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम एका आठवड्यात थेट बॅंक खात्यामध्ये जमा केली जाईल…!
मुंबई : ‘गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर गेले होते. राज्यातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवदर्शनाला गेले यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री ऍक्शन मोड वर आले असून त्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत. अवकाळी पाऊसामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
याचदरम्यान , काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पोहचले होते. त्यांनी पावसाने झालेल्या शेतीपिके तसेच भाजीपाला व फळबागांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि प्रमुख सरकारी अधिकारी ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. नुकसानग्रस्त भागातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. युद्धपातळीवर पंचनामे करावेत. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एका आठवड्यात त्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाईल, अशी मोठी घोषणा देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.