पत्रिकेतील गुणांपेक्षा स्वभाव जुळणं महत्त्वाचं! अभिनेता किरण माने यांचं परखड मत; लग्न ठरवताना विवेकाला द्या प्राधान्य

मुंबई : “सगळं काही छान जुळून आलं होतं. मुलगा-मुलगी दोघांचीही पसंती होती. दोघेही आयटी क्षेत्रात नोकरीला होते. मात्र, पत्रिकेत साडेअठरा गुण जुळल्याने लग्नाचा निर्णय अडला,” असा अनुभव सांगत मराठी चित्रपट अभिनेते किरण माने यांनी पत्रिका जुळवण्याच्या प्रथेबाबत परखड मत मांडले आहे.
आज अनेक कुटुंबांमध्ये लग्न जुळवताना पत्रिकेला मोठे महत्त्व दिले जाते. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत असतानाही पत्रिकेतील गुण कमी जुळल्याने लग्न मोडले जाते. मात्र, संसार टिकवण्यासाठी पत्रिकेतील गुण महत्त्वाचे आहेत की दोघांचे विचार, स्वभाव आणि एकमेकांबद्दलचा आदर, असा सवाल किरण माने यांनी उपस्थित केला आहे.


पत्रिकेवरून इतरांची लग्नं मोडणारे काही गुरुजी स्वतःच्या मुलांच्या प्रेमविवाहावेळी मात्र पत्रिकेपेक्षा पसंतीला महत्त्व देतात. मग तिथे मंगळदोष आणि ग्रहांची अडचण का येत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

किरण माने यांच्या मते, संसार पत्रिकेतील गुणांवर नव्हे, तर गुणी माणसांवर टिकतो. त्यामुळे लग्न ठरवताना मुलगा-मुलगी यांचा स्वभाव, विचार, परस्पर आदर, समजूतदारपणा, व्यसनांच्या सवयी आणि आरोग्य या गोष्टी तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.

पत्रिकेतील गुणांपेक्षा एकमेकांना समजून घेण्याची क्षमता आणि आयुष्यभर साथ देण्याची तयारी महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रह-ताऱ्यांच्या भीतीपेक्षा विवेकाने लग्नाचा निर्णय घ्यावा, असे मत अभिनेता किरण माने यांनी व्यक्त केले आहे.
