वाहनधारकांनो लक्ष द्या! PUC प्रमाणपत्राबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळी वैधता, जाणून घ्या नवे नियम


नवी दिल्ली : वाहनधारकांसाठी पीयूसी (PUC) प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाहनांमधून होणारे प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. आता BS-VI मानकांच्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी या प्रमाणपत्राच्या वैधतेत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. वाहनाचे वय आणि प्रकार लक्षात घेऊन प्रमाणपत्राची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनमालकांना आपल्या पीयूसी प्रमाणपत्राची वैधता तपासावी लागणार आहे.

खासगी वाहनांसाठी काय आहेत नवे नियम?

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Central Motor Vehicles Rules, 1989 मधील नियम 115 मध्ये सुधारणा केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार BS-VI मानकांच्या खासगी म्हणजेच नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी वाहनाच्या पहिल्या नोंदणीपासूनच्या वयानुसार पीयूसी प्रमाणपत्राची वैधता निश्चित करण्यात आली आहे.

खासगी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची मुदत :

– ६ वर्षांपर्यंतच्या वाहनांना – ३ वर्षे
– ६ ते १० वर्षे वयोगटातील वाहनांना – १ वर्ष
– १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना – ६ महिने

या नियमानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या खासगी BS-VI कार आणि दुचाकींचे पीयूसी प्रमाणपत्र तीन वर्षे वैध राहू शकते. सहा ते दहा वर्षे वयोगटातील वाहनांसाठी ही मुदत एक वर्ष, तर दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी सहा महिने असेल.

व्यावसायिक वाहनांसाठीही वैधतेची मुदत निश्चित

BS-VI मानकांच्या व्यावसायिक अर्थात ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी स्वतंत्र कालमर्यादा देण्यात आली आहे.

व्यावसायिक वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची मुदत :

– ६ वर्षांपर्यंतच्या वाहनांना – २ वर्षे
– ६ ते १० वर्षे वयोगटातील वाहनांना – १ वर्ष
– १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना – ६ महिने

यामुळे सहा वर्षांपर्यंत जुन्या BS-VI व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता मिळू शकते. मात्र, वाहनाचे वय वाढल्यानंतर प्रमाणपत्राचे नूतनीकरण कमी कालावधीत करावे लागेल.

BS-I ते BS-IV वाहनांसाठी काय नियम?

जुन्या उत्सर्जन मानकांनुसार तयार झालेल्या वाहनांसाठीही पीयूसी प्रमाणपत्राची वैधता निश्चित करण्यात आली आहे.

BS-I, BS-II आणि BS-III वाहने: पीयूसी प्रमाणपत्र 3 महिने वैध राहील.

BS-IV वाहने: पीयूसी प्रमाणपत्र 6 महिने वैध राहील.

त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे उत्सर्जन मानक आणि वय लक्षात घेऊन प्रमाणपत्राची मुदत तपासणे आवश्यक आहे.

नवे नियम कधीपासून लागू?

दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने 13 नोव्हेंबर 2026 रोजी G.S.R. 991(E) या अधिसूचनेद्वारे Central Motor Vehicles (Sixteenth Amendment) Rules, 2026 जारी केले. ही अधिसूचना 16 नोव्हेंबर 2026 रोजी सरकारी राजपत्रात प्रकाशित झाली असून, त्याच तारखेपासून हे नियम लागू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नियम लागू होण्यापूर्वी जारी केलेल्या पीयूसी प्रमाणपत्रांना नवीन वैधता कालावधी पहिल्या नूतनीकरणाच्या वेळी लागू होईल. तसेच, सध्याच्या प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या आधीच्या दहा दिवसांत नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास नवीन प्रमाणपत्राची वैधता जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर सुरू होईल. मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केल्यास नवीन प्रमाणपत्राची वैधता नूतनीकरणाच्या तारखेपासून सुरू होईल.

त्यामुळे वाहनमालकांनी आपल्या वाहनाची पहिली नोंदणी तारीख, उत्सर्जन मानक आणि सध्याच्या पीयूसी प्रमाणपत्राची वैधता तपासावी. नव्या नियमांमुळे काही वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी वैध पीयूसी प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!