अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ आणखी किती दिवस कायम राहणार? दत्ता भरणेंचा मोठा इशारा; म्हणाले, ‘उशीर होतोय तसा संभ्रम वाढतोय!’

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला? या दुर्घटनेमागचं खरं कारण कधी समोर येणार? असे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अपघाताच्या चौकशीला होत असलेल्या विलंबामुळे राजकीय वर्तुळातही अस्वस्थता वाढत असताना आता कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. अजितदादांच्या मृत्यूचं सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे. तपासाला जितका उशीर होत आहे, तितका अनेकांच्या मनातील संभ्रम वाढत चालला आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
२८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. तसेच तपासाला गती मिळावी यासाठी केंद्र सरकारला पत्रही पाठवलं होतं. अपघाताच्या चौकशीबाबत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.


‘मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार’; अमित शाहांकडे अहवालाची मागणी

या पार्श्वभूमीवर दत्ता भरणे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य समोर येणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही सर्व नेते पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे लवकरात लवकर सादर व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आता हा अहवाल तातडीने समोर यावा, अशी आमचीही अपेक्षा आहे, असं भरणे यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, १६ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या तपासाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी अमित शाह यांच्याकडे चौकशीचा अहवाल लवकर जाहीर करण्याची विनंती केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही या अहवालाबाबत पाठपुरावा होत असल्याचं दिसत आहे.
रोहित पवारांच्या आरोपांवर भरणेंचं प्रत्युत्तर
दरम्यान, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर भरणे यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं. एखादी व्यक्ती कोणाच्या लग्नाला गेली किंवा तिने मफलर घातला, म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढणं योग्य नाही, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील संबंध आपण स्वतः पाहिले आहेत. दोघांमधील नातं चांगलं होतं, असं सांगत त्यांनी फडणवीस यांची बाजू मांडली.
बारामती विमानतळाच्या विकासकामाबाबतही त्यांनी माहिती दिली. अजित पवार हयात असतानाच विमानतळाच्या कामासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आता सरकारने या कामासाठी निधी मंजूर केला असून विमानतळाचं काम पुढे नेण्यात येईल, असं भरणे यांनी स्पष्ट केलं.
दहा लाख शेतकरी पाच हजारांच्या मदतीपासून वंचित
यावेळी भरणे यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आगाऊ मदत अद्याप मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांची कागदपत्रं अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी सामायिक शेती असल्यामुळे मदत मिळण्यात अडचणी आल्या आहेत. मात्र, या शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
मतदान प्रक्रियेबाबतही भरणेंचं महत्त्वाचं आवाहन
मतदानाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पारदर्शकतेवर भर दिला. कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तीची शेती मूळ गावी असेल आणि तिथे मतदानाची प्रक्रिया सुरू असेल, तर मतदानाच्या ठिकाणाबाबत योग्य व्यवस्था असावी. प्रत्येकाने एकाच ठिकाणी मतदान करावं. मतदान प्रक्रियेत खालच्या स्तरावर कोणत्याही प्रकारचं राजकारण होता कामा नये. जे खरं आहे ते खरं आणि जे खोटं आहे ते खोटं, सर्व प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
एकीकडे रोहित पवार यांच्याकडून अपघाताच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे दत्ता भरणे यांनीही अहवाल लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल कधी समोर येणार आणि त्यातून कोणती माहिती उघड होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
