धक्कादायक खुलासा! ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी उलथापालथ; 1.25 कोटी महिलांना अपात्र ठरवल्याचा दावा, सुप्रिया सुळे आक्रमक

मुंबई : राज्यात मोठ्या उत्साहात सुरू झालेली ‘लाडकी बहीण’ योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोट्यवधी महिलांना आर्थिक मदत देणारी ही योजना आता आकडेवारीतील प्रचंड तफावतीमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. सुरुवातीला जाहीर केलेल्या लाभार्थी संख्येपेक्षा आता तब्बल 1 कोटी 25 लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून विरोधकांनी सरकारवर थेट पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला सुमारे 2.37 कोटी महिलांना योजनेचा लाभ दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र नंतर ही संख्या वाढवून 2.46 ते 2.48 कोटीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले गेले. त्यानंतर e-KYC प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेल्याचे दिसून आले.

सध्याच्या आकडेवारीनुसार सुमारे 80 लाखांहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून आता फक्त 1.66 कोटी महिलांनाच लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत पोर्टलवरील आकडे वेगळेच चित्र दर्शवत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

पोर्टलनुसार अर्जांची संख्या फक्त 1.12 कोटी असून मंजूर अर्ज 1.06 कोटी इतकेच आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून आजपर्यंतच्या आकडेवारीत मोठी विसंगती असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. लाभार्थ्यांची नेमकी संख्या काय आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र का ठरवले गेले, आणि पडताळणी प्रक्रियेत कोणते निकष लावण्यात आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सुळे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण योजनेचे आर्थिक आणि प्रशासकीय ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.