जगातील सर्वात मोठ्या चिप कंपनीत चिनी महिलेचा शिरकाव; हेरगिरीच्या संशयाने अमेरिकेत खळबळ


न्यूयॉर्क : जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडिया सध्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आली आहे. कंपनीचे सीईओ जेन्सन हुआंग यांचे एका चिनी व्यावसायिक महिलेसोबत जवळचे संबंध असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे, या महिलेकडून चीनसाठी गुप्त माहिती गोळा केली जात असल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ॲलिस हुआंग (हुआंग ले) असे या महिलेचे नाव असून ती सिंगापूरस्थित मेगास्पीड इंटरनॅशनल या कंपनीशी संबंधित होती. एनव्हिडियाच्या प्रगत एआय चिप्सच्या खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारांमुळेही तिचे नाव चर्चेत आले आहे. या कंपनीने गेल्या दोन वर्षांत एनव्हिडियाकडून सुमारे ४.८ अब्ज डॉलर किमतीच्या चिप्स खरेदी केल्याचे वृत्त आहे.

एनव्हिडियाच्या सीईओंची कबुली; कंपनीकडून स्वतंत्र चौकशी

या वादाच्या पार्श्वभूमीवर जेन्सन हुआंग यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली आणि कुटुंबीयांची माफी मागितली. मात्र, संबंधित महिलेकडून हेरगिरी झाल्याच्या आरोपांबाबत त्यांनी थेट भाष्य केलेले नाही.

दरम्यान, एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. परदेशी गुप्तचर यंत्रणेकडून सीईओंना लक्ष्य करण्यात आले होते का, याचा तपास केला जाणार आहे. कंपनीने सध्या तरी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा एनव्हिडियाच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चीनकडून आरोपांचे खंडन

या प्रकरणामुळे अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञानविषयक तणाव पुन्हा चर्चेत आला आहे. चीनने हेरगिरीचे आरोप फेटाळून लावत ते निराधार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेत या प्रकरणाच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

एनव्हिडिया ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या चिप्स तयार करणारी कंपनी असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कंपनीच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!