सतेज पाटलांचा सभेत मोठा गौप्यस्फोट! भाषणाच्या पहिल्याच ११ मिनिटांत शासन नियुक्त संचालकांची नावे केली जाहीर…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या तज्ज्ञ संचालक नियुक्तीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवणाऱ्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने आता महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या नियुक्त्यांविरोधात रस्त्यापासून न्यायालयापर्यंत लढा देण्याचा इशारा दिला आहे.

आज आयोजित संघर्ष मोर्चात बोलताना सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांची नावे जाहीर केली. सरकारने अद्याप यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) अपलोड केलेला नसतानाही प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आपल्याला ही माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
कोणाची झाली तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती?
सतेज पाटील यांनी सभेत शिवाजी अडनाईक, डॉ. प्रवीण हेंद्रे, कृष्णात पाटील आणि सांगलीतील ॲड. प्रशांत पाटोळे यांची नावे जाहीर केली. सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांच्या नावांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘सांगलीचा माणूस गोकुळमध्ये संचालक कसा?’
नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करताना सतेज पाटील यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. सांगलीतील व्यक्तीची गोकुळमध्ये संचालक म्हणून नियुक्ती कशी केली जाऊ शकते? कोल्हापूर जिल्ह्यात एकही पात्र व्यक्ती किंवा दूध उत्पादक सरकारला मिळाला नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञाची गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यामागचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याचा आरोप
गोकुळमधील या नियुक्त्या केवळ संचालक मंडळापुरत्या मर्यादित नसून कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. सांगलीतील तज्ज्ञांची नियुक्ती करून गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. कोल्हापूरचा सहकार आणि गोकुळ दूध संघ उद्ध्वस्त करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सतेज पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोकुळमधील तज्ज्ञ संचालक नियुक्तीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
