आईच्या काळजीसाठी पुण्यात येण्याची इच्छा, पण न्यायालयाने दारच बंद केलं! गणेश मारणेचा अर्ज फेटाळला; दुसरीकडे पोलिसांसमोरच तरुणाचा निर्घृण खून

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी गणेश निवृत्ती मारणे याला जामीन मिळाला असला, तरी पुण्यात परतण्याचा मार्ग तूर्तास बंदच राहणार आहे. वृद्ध आईची काळजी घ्यायची आहे, कुटुंबीय पुण्यात आहेत, व्यवसायही शहरात असून तीन मुलांचे शिक्षण सुरू आहे, अशी कारणे देत मारणे याने न्यायालयाकडे प्रवेशबंदी उठवण्याची विनंती केली होती. मात्र, साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे आल्याने विशेष मकोका न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. ७ नोव्हेंबरच्या या निर्णयामुळे मारणे याला मोठा धक्का बसला आहे.

मारणे याला ७ मे २०२६ रोजी जामीन मंजूर करताना न्यायालयाने तीन वर्षे किंवा खटल्याचा निकाल लागेपर्यंत पुणे शहरात प्रवेश करण्यास मनाई केली होती. ही अट शिथिल करण्यासाठी त्याने अर्ज दाखल केला. मात्र, त्याच्या पुण्यातील उपस्थितीमुळे खटल्यातील साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली.
विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत आणि शरद मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने ॲड. खेताराम सोलंकी, ॲड. संकेत राव, ॲड. तेजस सावंत आणि ॲड. भानुदास कोळी यांनी अर्जाला विरोध केला. मारणे याच्याविरुद्ध यापूर्वी सात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्याला शहरात प्रवेश दिल्यास साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

विशेष मकोका न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यानंतर मारणेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे वृद्ध आईची काळजी घेण्यासह कौटुंबिक कारणे देऊनही त्याला पुण्यात प्रवेश मिळू शकलेला नाही.

पोलिसांची गस्त सुरू असतानाच रक्तरंजित हल्ला!
या घडामोडींदरम्यान पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात आणखी एक खळबळजनक घटना घडली. ७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकाश ऊर्फ लाल्या येवले (वय २७) या तरुणावर तलवार, कोयता आणि लोखंडी हत्यारांनी हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. डोक्यावर आणि पाठीवर वार केल्यानंतर लाकडी दांडक्यानेही त्याला मारहाण करण्यात आली. जुन्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, याच वेळी कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी आणि परिसरातील अवैध धंद्यांची पाहणी करण्यासाठी गस्त घालत होते. प्रकाश येवले हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याने त्याच्या घरी तपासणीसाठी जाण्याच्या तयारीत कर्मचारी होते. तेवढ्यात रस्त्यावर काही जण एका तरुणाला मारहाण करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर जखमी प्रकाशला स्थानिक नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विकी मोरे आणि अनिकेत मालपोटे या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. एकीकडे गणेश मारणेच्या पुणे प्रवेशबंदीवर न्यायालयाचा कठोर निर्णय, तर दुसरीकडे पोलिसांसमोरच झालेली हत्या; या दोन घटनांमुळे पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
