‘मुख्यमंत्री महोदय कर्जमाफीवर बोलताना वारकऱ्यांनी पगडी घालून बोलू नका, पगडीवर पांडुरंगाच्या आचार विचाराचे संस्कार आहेत’

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री महोदय तुम्ही वारकऱ्यांची जी पगडी घातली आहे त्या पगडीचा इतिहास आहे.
पांडूरंगाचा भक्त असणारा व डोक्यावर पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोट बोलतो, ना कधी कुणाला फसवितो, ना कधी कुणाची निंदा नालस्ती करतो, त्याच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा विठ्ठलाचा शब्द प्रमाण माणून तो जीवाच्या आकांताने पुर्ण करतो.
याचे कारण या माझ्या वारकऱ्यावर पांडुरंगाचे संस्कार आहेत. कर्जमाफीच्या तुमच्या नियम व पध्दतीमुळे राजकारणाच्या व सत्तेच्या साठमारीत राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज ८ शेतक-यांच्या माता भगिनींचे कपाळाचे कूंकु पुसण्याचे पाप तुम्ही करत आहात.
यामुळे कर्जमाफीवर बोलताना किमान वारकऱ्याची पगडी घालून तरी बोलू नका कारण या पगडीवर पांडुरंगाच्या आचार विचाराचे संस्कार आहेत, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी अनेकजण आंदोलन करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषण केले होते. त्यांना आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आता सरकार नेमकं कधी निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.