त्या रात्रीचा गोळीबार आणि दीड वर्षांनी मोठा धक्का! बाबा सिद्दीकी प्रकरणात अंगरक्षक थेट सेवेतून बडतर्फ

मुंबई : एका गोळीबाराने राज्य हादरले… आणि दीड वर्षांनंतर त्या प्रकरणात पुन्हा एकदा मोठी कारवाई समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस हवालदार श्याम सोनवणे यांना अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. काही क्षणांत घडलेल्या या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी ते आपल्या पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर उपस्थित होते. या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणात श्याम सोनवणे हे त्यांचे अंगरक्षक म्हणून तैनात होते. मात्र हल्ल्याच्या वेळी त्यांनी योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली नाही, तसेच प्रतिकार किंवा तत्काळ कारवाई करण्यात अपयश आले, असा गंभीर आरोप ठेवण्यात आला. याच निष्काळजीपणामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

घटनेनंतर त्यांना तातडीने १८ ऑक्टोबर २०२४ रोजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यावर २९ सप्टेंबर २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि अखेर ३० एप्रिल २०२६ रोजी बडतर्फीचा आदेश जारी करण्यात आला. २ मे २०२६ रोजी त्यांनी तो स्वीकारला आणि त्यांची पोलीस सेवा संपुष्टात आली.

पोलिसांच्या अधिकृत आदेशानुसार, त्या रात्री सुरक्षा व्यवस्थेतही मोठी त्रुटी होती. ‘२+१’ सुरक्षा रचनेत फक्त एकच कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होता. रात्री ९:३० च्या सुमारास हल्ला झाला आणि काही क्षणांतच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.
चौकशीत सोनवणे यांनी सांगितले की, दसऱ्याच्या मिरवणुका आणि फटाक्यांच्या आवाजामुळे गोंधळ निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांना हल्लेखोर ओळखता आले नाहीत. मात्र तपास यंत्रणांनी ही बाजू मान्य केली नाही.
दरम्यान, या हत्याकांडात गँगस्टर अनमोल बिश्नोई याच्यासह आतापर्यंत २७ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि जबाबदारीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.