स्पाच्या नावाखाली सुरू होता‘काळा धंदा’; डमी ग्राहक ४ हजार घेऊन आत गेला अन् पोलिसांनी थेट छापा टाकला, ४ महिलांची सुटका!


नांदेड : नांदेड शहरातील विद्युतनगर चौक, आनंदनगर रोड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली कथितरित्या सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या या कारवाईत एका २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, महाराष्ट्र आणि आसाममधील चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. आनंदनगर रोडवरील एका ‘स्पा मसाज सेंटर’मध्ये मसाज सेंटरच्या आडून अवैध कुंटणखाना चालवला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मात्र, केवळ माहितीच्या आधारे कारवाई न करता पोलिसांनी आधी या प्रकाराची खातरजमा करण्याचे ठरवले.

त्यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीला डमी ग्राहक म्हणून तयार केले. त्याच्याकडे चार हजार रुपयांची रोकड देऊन त्याला स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आतमध्ये पोलिसांना संशय असलेला प्रकार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ठरलेला संकेत दिला. संकेत मिळताच रात्री सुमारे नऊ वाजता पोलिसांच्या पथकाने सेंटरवर धाड टाकली.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे सेंटरमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी गौरव राजकुमार सरपाते (वय २०, रा. राहुलनगर, हनुमानगड, नांदेड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गौरवने या व्यवसायात आपली २० टक्के भागीदारी असल्याचे सांगितले. तसेच पवितसंघ आरतीया (महाराज) याची ८० टक्के भागीदारी असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे तपासात समोर आले आहे.

छाप्यात पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली. त्यातील काही महिला महाराष्ट्रातील, तर काही आसाम राज्यातील असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी डमी ग्राहकाकडे देण्यात आलेली ४ हजार रुपयांची रोकड आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा आयफोन १४ प्रो, असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील इतर व्यक्तींची भूमिका तसेच स्पा सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित व्यवहाराचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!