खाऊचं आमिष, घरात बोलावलं अन् दोन चिमुकल्यांशी अश्लील कृत्य; बारामतीत ५९ वर्षीय व्यक्तीवर गंभीर गुन्हा

बारामती : बारामती शहरात अल्पवयीन दोन बहिणींशी अश्लील कृत्य केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आठ आणि चार वर्षांच्या या चिमुकल्या मुलींना खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गैरप्रकार केल्याचा आरोप ५९ वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात देविदास नारायण शिवदे (वय ५९) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पीडित दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असून त्यांचे वय अनुक्रमे आठ आणि चार वर्षे आहे. त्यांच्या आईने कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दोन्ही मुली परिसरातील त्यांच्या मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी गेल्या असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.


मुली खेळण्यासाठी बाहेर गेल्या असताना त्यांची तोंडओळख असलेल्या शिवदे याने त्यांना खाऊ देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलवून दोन्ही बहिणींना आपल्या घरी नेण्यात आले. त्यानंतर घरातील खाटेवर झोपवून दोघींशी अश्लील चाळे केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर मुलींना हा प्रकार कोणालाही सांगू नये, असे बजावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे. त्यामुळे मुलींमध्ये भीती निर्माण झाली होती. अखेर हा प्रकार त्यांच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. अल्पवयीन मुलींशी संबंधित असल्याने पोलिसांकडून विविध पैलूंचा तपास करण्यात येत आहे. घटनेची सत्यता, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार अशोक राऊत करीत आहेत. चिमुकल्या मुलींशी संबंधित या घटनेमुळे बारामती परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.