काही सेकंदांत संपलं सगळं! भरधाव कार ट्रकवर आदळली अन् अभिनेता भारत कांतचा जागीच मृत्यू

हैदराबाद : दिग्गज निर्माते आर. बी. चौधरी यांच्या निधनाच्या धक्क्यातून सिनेसृष्टी सावरत असतानाच आता आणखी एका भीषण घटनेने टॉलीवूड हादरलं आहे. लोकप्रिय अभिनेता, YouTuber आणि कंटेन्ट क्रिएटर भारत कांत आणि प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर साई त्रिलोक यांचा रविवारी पहाटे भीषण अपघातात मृत्यू झाला. दोघेही एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र होते. या दुर्घटनेत त्यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

ही दुर्घटना हैदराबादच्या आउटर रिंग रोडवरील एक्झिट क्रमांक 12 जवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत कांत आणि साई त्रिलोक हे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून हैदराबादला परतत होते. शनिवारी रात्री त्यांनी प्रवास सुरू केला होता. पहाटे सुमारे 3:20 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेड्डा अंबरपेट परिसरातून ORR वर प्रवेश केला आणि शमशाबादच्या दिशेने निघाले होते. मात्र, बंगळुरू-थुक्कूगुडा मार्गावरील 111.5 किलोमीटरच्या टप्प्यावर त्यांच्या भरधाव कारने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अपघातानंतर दोघेही कारमध्ये गंभीर अवस्थेत अडकले होते. स्थानिकांनी आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केलं, मात्र तोपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळावरून समोर आलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आदिबाटला पोलिसांनी प्राथमिक तपासात अतिवेग आणि चालकाचा थकवा हे अपघातामागील प्रमुख कारण असावं, असा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारे मृतांची ओळख पटवली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

31 वर्षीय भारत कांत हा टॉलीवूडमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत होता. अभिनयासोबतच तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय होता. Instagram वर त्याचे जवळपास 40 हजार फॉलोअर्स तर YouTube वर सुमारे 30 हजार सब्स्क्रायबर्स होते. तेलुगू सिनेमांमध्ये आणि लघुपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर साई त्रिलोक हा सिनेमॅटोग्राफी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत होता.
या दुर्दैवी घटनेनंतर टॉलीवूडमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.