छत्रपती’ची रणधुमाळी लवकरच जाहीर होणार! इच्छुकांच्या अजितदादांकडे भेटी वाढल्या, कारखाना बिनविरोध होण्याचीही चर्चा..


भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी कारखान्यातून तसेच इतर सहकारी संस्थांतून थकबाकी नसल्याचे दाखले घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे फिल्डिंग लावली जात असून भेटीगाठी वाढल्या आहेत. येत्या तीन-चार दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाची मुदत संपून पाच वर्षे झाली आहेत व संचालक मंडळाने मागील निवडणूक झाल्यापासून आता अकराव्या वर्षात पदार्पण केले आहे.

यामुळे परिसरात वातावरण तापले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा विषय न्यायप्रविष्ट झाल्याने संचालक मंडळाला पाच वर्षांचा कार्यकाल वाढवून मिळाला आहे. आता निवडणूक लवकरच जाहीर होत असल्याने वाट पाहत असलेल्या संचालक इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कारखाना आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या तुलनेत कमी दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दोन वर्षांपासून कारखान्याची वार्षिक सभा देखील घेण्यात आली नाही.

दरम्यान, एकाबाजूला कारखाना बिनविरोध होईल, अशी देखील चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या अजित पवार गट, पृथ्वीराज जाचक गट, घोलप गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उमेदवारी मिळवणे हे इच्छुकांच्या समोर मोठे आव्हान आहे.

निवडणुकीकडे इच्छुक उमेदवारांप्रमाणेच मतदार सभासदांचे देखील लक्ष लागलेले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध, दुरंगी, का तिरंगी होणार याबाबत सभासदांमधून चर्चेला सुरुवात झाली आहे. यामुळे येणारी निवडणूक ही अनेक अंगाने महत्वाची ठरणार आहे. लवकरच याबाबत अंतिम स्वरूप पुढे येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!