अजितदादांच्या अपघातावर सुनेत्रा पवारांचा मोठा खुलासा; फडणवीसांसमोर संशय व्यक्त..

बारामती : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी पार पडणार असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली.

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रथमच गंभीर शंका व्यक्त करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
अजित पवार यांच्या निधनाला तीन महिने पूर्ण झाले असताना, या अपघातामागील कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अपघातामध्ये काहीतरी दडवले जात असल्याची शंका व्यक्त करत त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती दिली.

या भेटीत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, कोणताही कट उघड झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अपघातामागील सत्य लवकरात लवकर समोर यावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या मागणीला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन देत, सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, अशी ग्वाही दिली. या सभेमुळे अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.