संपूर्ण देश हादरवणाऱ्या ओडिशातील रेल्वे अपघातामागे घातपात? आता सीबीआय चौकशीची होणार
ओडिशा : ओडिशातील बालासोर जिह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघात मानवी चुकीमुळे झाला. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉपिंग सिस्टम आणि पॉइंट मशीन यंत्रणेत गडबड करण्यात आली. यामागे घातपाताची शक्यता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच व्यक्त केली आहे. गुन्हेगारांची ओळख पटली असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, असेही त्यांनी जाहीर केले.
हा अपघात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील इलेक्ट्रिक पॉइंट मशिन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलांमुळे घडला आहे. सिग्नल यंत्रणेतील पॉइंट मशिनची सेटिंग बदलण्यात आली होती. ही सेटिंग कशी आणि का बदलण्यात आली हे चौकशी अहवालातून समोर येईल,’ असेही वैष्णव यांनी सांगितले. ‘ज्या पद्धतीने अपघात झाला, ती परिस्थिती पाहता आणि प्रशासकीय माहितीनुसार रेल्वे बोर्डाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे,’ असे वैष्णव म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉपिंग सिस्टम व पॉइंट मशीन ही एररप्रूफ यंत्रणा आहे. ही यंत्रणा फेल झाली तर मार्गावरील सर्व सिग्नल लाल होतात व वाहतूकच बंद होते. मात्र रेल्वेमंत्र्यांना जर घातपाताची शंका असेल तर कोणीतरी सिग्नल यंत्रणेत गडबड केली असावी, असे रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले.
… तर मालगाडी मागे सरकली असती
कोरोमंडल एक्सप्रेस ज्या मालगाडीला धडकली त्यात लोखंड भरले होते. त्यामुळे धडकेनंतर मालगाडी हलली नाही. मालगाडी वजनदार होती. मालगाडीत कमी वजन असते तर कोरोमंडल एक्सप्रेसच्या धडकेनंतर मागे सरकली असती. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबेही रुळावरून घसरले नसते आणि भीषण अपघात टळला असता, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.