वाईच्या पसरणी घाटात कार खोल दरीत कोळसली, लोणी काळभोरच्या दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी, घटनेने परिसरात हळहळ

पाचगणी : येथील पसरणी घाटात चारचाकी फोर्ड एंडेव्हर गाडीचा अपघात होऊन गाडी सुमारे दोनशे फूट दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, सर्वजण लोणी काळभोर (पुणे) येथील आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले. यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, लोणी काळभोर येथील बजरंग पर्वतराव काळभोर, सौरभ जालिंदर काळभोर, अक्षय मस्कू काळभोर, वैभव काळभोर हे सर्व इंडिएवर कार गाडीने कोकणामध्ये फिरण्यासाठी गेले होते. महाबळेश्वर येथे फिरून माघारी पुण्याला जात असताना बुवासाहेब मंदिराच्या खालील बाजूस पालखी रस्त्यानजीक कार सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना नजीकच्या बेलेर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. अक्षय मस्कु काळभोर व सौरभ जालिंदर काळभोर अशी या दोघांची नावे असून, बजरंग पर्वतराव काळभोर व वैभव काळभोर हे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, शिवसह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने व स्थानिक युवक पसरणीचे माजी उपसरपंच विशाल शिर्के, गणेश शिर्के, अजय शिर्के, अमोल महांगडे, प्रवीण शिर्के, आबा होमणे, अक्षय मोहिते, मोहित काकडे आदींनी जखमींना स्ट्रेचरवरून दोनशे फूट दरीतून वरती काढले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.