व्हॉर्न वाजवल्यामुळे कार चालक चिडला, पीएमपी बसचालकाला केली मारहाण; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
पुणे : बसस्टॉपसमोर बसपुढे कार थांबविल्याने बसचालकाने व्हॉर्न वाजविला, त्याचा राग येऊन एका २० वर्षाच्या कारचालकाने बसमध्ये शिरुन चालकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी बसचालक तुषार खंडेराव डोंबाळे (वय. ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल लोंढे (वय. २०, रा. संकेत विहार, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तुषार डोंबाळे हे पीएमपीच्या हडपसर आगारात चालक म्हणून काम करतात. बुधवारी सायंकाळी ते बस घेऊन हडपसरहून निघाले. संकेत विहार येथील बसस्टॉपवर त्यांनी प्रवाशांना चढण्या -उतरण्यासाठी बस थांबविली. तेवढ्यात एक नंबर तुटलेली झेन कार बसच्या पुढे येऊन उभी राहिली.
त्यामुळे डोंबाळे यांना बस पुढे काढता येईना, त्यामुळे त्यांनी व्हॉर्न वाजविला. तेव्हा कारमधून एक मुलगा बाहेर आला. त्याने बसचालकाला शिवीगाळ करुन बस मागे घे असे म्हणाला. तेव्हा चालकाने बस मागे घेतली. तो मुलगा बसमध्ये चढला.
त्याने बसचालक डोंबाळे यांना हाताच्या चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जोराजोरात शिवीगाळ करु लागला. नंतर तो बसमधून उतरला. तेथे ज्याचे आई वडिलही आले. ते त्याला घेऊन गेले.
याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी आले. बसचालकांनी उपचार घेतल्यानंतर तक्रार दिली असून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अमोल लोंढे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.