Brij Bhushan Sharan Singh : मनसेच्या परप्रांतीयांना विरोधाचा बृजभूषण यांनी लावला सोक्षमोक्ष, नेमकं घडलं काय?
Brij Bhushan Sharan Singh : मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचे हित केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती. त्याच्या सोबतीला हिंदुत्वही होतेच. मनसेच्या या भूमिकेमुळे अनेकवेळा संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांना मारहाण करण्यात आली.
इतकेच नव्हे, तर विधिमंडळात आमदारकीची शपथ मराठीत घेतल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मनसेच्या आमदारांनी मारहाण केली होती. आता मात्र मनसेची भूमिका मवाळ झाली आहे.
उत्तर प्रदेशातील भाजपचे वादग्रस्त खासदार, कुस्ती महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात अक्षरशः आग ओकली होती. मात्र, राज ठाकरे आणि मनसे त्यावेळी शांतच राहिले.
उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा, तरुणांचा रोजगार हिरावला जातो, रेल्वे भरतीत उत्तर भारतीयांना अधिक संधी मिळते, असे मनसेचे आक्षेप आहेत. रेल्वेभरतीची जाहिरात मराठीत प्रसिद्ध करायला मनसेने भाग पाडले.
उत्तर भारतीय नागरिक मुंबई, पुण्यासह राज्यभरातील विविध शहरांमध्ये येऊन मिळेल ती कामे करतात. अनेक कुशल कामे करवून घेण्यासाठी उत्तर भारतीय कारागिरांवर अवलंबून राहावे लागते. Brij Bhushan Sharan Singh
उत्तर भारतीय नागरिक राज्यभरात विविध व्यवसायही करतात. अशा नागरिकांना मनसेने ( काही वर्षांपूर्वी लक्ष्य केले होते. दुकानदारांवर हल्ले, उत्तर भारतीय कारागिरांना मारहाण, रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण असे प्रकार घडले होते.
इतकेच नव्हे, तर उत्तर भारतीय, बिहारी लोकांच्या छटपूजा उत्सवालाही मनसेचा विरोध होता. छटपूजेला विरोध नाही. मात्र, या निमित्ताने काही उत्तर भारतीय नेते येथे येऊन राजकारण करतात, याला आक्षेप असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
राज ठाकरे 2022 मध्ये अयोध्येला दर्शनासाठी जाणार होते. या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर मोठ्या घडामोडी सुरू झाल्या. उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला.
राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मुंबईत उघडपणे मारहाण केली, त्यांना अपमानित केले. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतरच त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाईल, अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहनही बृजभूषण यांनी केले होते. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती.