उरुळीकांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ ! दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून अडीच लाखाचा मुद्देमाल व रोकड लंपास…!

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील तुपे वस्तीवर (भाडळे कॉलनी, ज्योतिबा मंदिराजवळ) येथे राहणारे तुषार मधुकर जगताप यांचे बंद घर दिवसा ढवळ्या सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान चोरट्यांनी फोडून त्यामधील सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे काही दागिने व रोख 25 हजार रुपये रक्कम असा अडीच लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
यायाप्रकरणी , जगताप यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . तुषार जगताप हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, आज त्यांना डिस्चार्ज मिळणार होता म्हणून घरातील अन्य व्यक्ती त्यांना आणण्यासाठी घराला कुलूप लावून हॉस्पिटलमध्ये गेले असता चोरट्यांनी वेळ साधून कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटा मधील ऐवज चोरुन नेला आहे.
तत्पूर्वी , उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत चोरट्यांनी अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालून बऱ्याच ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत. चोरट्यांनी सर्वत्र दहशत निर्माण केली आहे, मात्र उरुळी कांचन पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणा किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणा याबाबत कठोर कारवाई वा चोरट्यांना पायबंद घालण्याचे काम होताना दिसत नाही, असा नाराजीचा सूर उरुळी कांचन परिसरात आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य अशोक कसबे यांनी ही घरफोडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.