माझे हातपाय तोडा, पण…!! जीव जाण्याआधी संतोष देशमुखांची मारेकऱ्यांकडे काय सांगितलं, मुलीने सगळंच सांगितलं

बीड : हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून आरोपींनी देशमुख यांच्यावर कसा अमानुष अत्याचार केला याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असताना आता संतोष देशमुख यांनी हत्येआधी केलेल्या विनवणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हत्येआधी संतोष देशमुख मारेकऱ्यांकडे काय विनवणी करत होते, याबाबत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने महत्वाचे विधान केले आहे.
माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली. पण या लोकांना खंडणी मागायला कुणी पाठवलं? त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त होता. याची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावं, अशी मागणी वैभवीनं केली आहे.
दरम्यान, त्यांनी हत्येच्या आधी संतोष देशमुख यांनी मारेकऱ्यांकडे काय विनवणी केली होती? याबाबतचा खुलासा वैभवी देशमुखनं केला आहे. माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते माझे हातपाय तोडा, पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या, अशी विनवणी करत होते. पण त्यांनी कसलीही दयामया दाखवली नाही. ते निर्दयीपणे मारहाण करत राहिले, अशी भावनिक प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे.
दरम्यान, ९ डिसेंबर रोजी देशमुखांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना अमानुषपणे मारहाण करून संपवण्यात आले. आरोपींनी त्यांना अत्यंत हालहाल करून मारल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.