भाजपला मोठा धक्का!! राज्यात पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना एकत्र, राजकीय समीकरण बदलणार?


पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली. त्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय दुश्मनी ही टोकाला पोहोचलेली आहे.

मात्र, आता सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी घटना पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषद निवडणुकीत घडली आहे. येथे दोन्ही गटांचे नेते एका मंचावर आल्याचे दृश्य महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहे. चाकण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला ठाकरे गटाने दिलेला पाठिंबा हा राज्याच्या राजकीय समीकरणांना नवीन वळण देणारा क्षण होता.

दोन्ही शिवसेनांच्या कार्यकर्त्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वजण या घडामोडीकडे बारकाईने पाहत आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर संघर्ष असताना, स्थानिक पातळीवरील अशी ‘एकजूट’ अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.

       

नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून मनीषा सुरेश गोरे यांनी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी जाताच, शिंदे गटाचे शिरूरचे आमदार शरद सोनवणे आणि ठाकरे गटाचे खेडचे आमदार बाबाजी काळे हे दोन्ही नेते एकत्र दिसले.

दरम्यान, या अप्रतिम एकत्रिकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य पाहून अनेकांचा विश्वास बसला नाही की दोन्ही गट असे कसे एकत्र येऊ शकतात. या युतीसंदर्भात खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर चाकणमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे.

त्यांच्या पत्नी मनीषा गोरे या उमेदवार आहेत, आणि त्यांच्या सन्मानार्थ राजकारण बाजूला ठेवून आम्ही पाठिंबा दिला असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी हेही नमूद केले की ही औपचारिक युती नाही, फक्त परिस्थितीजन्य एकत्रिकरण आहे.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, चाकणमध्ये घेतलेला हा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. बाबाजी काळेंनी सांगितले की राजगुरुनगर आणि आळंदी येथील निवडणुकांमध्ये ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!