बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची आकाशात गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून मारली स्काय डायव्हिंगची उत्तुंग झेप..


​उरुळी कांचन : बोरीभडक (ता. दौंड) येथील साईराज संदीप गव्हाणे (रा. बोरीभडक, ता. दौंड) याने थायलंडमधील फुकेत येथे 18 हजार फुटांच्या उंचीवरून विमानातून आकाशात झेप घेत स्काय डायव्हिंगचा अद्भूत पराक्रम केला आहे. अवघ्या 14 व्या वर्षी दाखवलेल्या या धाडसामुळे साईराजचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या या कामगिरीने ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

उरुळी कांचन येथील प्रसिद्ध उद्योजक व ‘जानाई डेव्हलपर्स’चे मालक संदीप गव्हाणे यांचा 14 वर्षीय मुलगा ​साईराज सध्या सातारा जिल्ह्यातील ‘बिली मोरिया हायस्कूल, पाचगणी’ येथे इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे.

त्याला लहानपणापासूनच धाडसी खेळांची विशेष आवड असून, आकाशात उंच भरारी घेण्याचे त्याचे स्वप्न होते. “मला आकाशातून मोकळी झेप घ्यायची आहे,” हा त्याचा ध्यास अखेर थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून यशस्वी स्काय डायव्हिंग करून पूर्ण झाला. या आव्हानात्मक कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, शाळेतही त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

साईराजचे अंतिम ध्येय देशाचे ‘फायटर जेट विमान’ (लढाऊ विमान) चालवण्याचे आहे. मुलाचे हे स्वप्न साकार व्हावे आणि त्याने स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवावे, यासाठी त्याचे वडील संदीप गव्हाणे व संपूर्ण कुटुंबीय खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहेत. “मुलांमधील सुप्त गुणांना आणि आवडीला वाव देऊन पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,” असा संदेश या प्रसंगी गव्हाणे कुटुंबीयांनी दिला.
​
दरम्यान, साईराजच्या या यशात आणि धाडसी प्रवासात त्याला बिली मोरिया हायस्कूलच्या अदिती गोर्डीया यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. उरुळी कांचन व दौंड परिसराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या साईराजवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!