शिंदे गटाच्या आमदाराकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण, दिली जीवे मारण्याची धमकी, घटनेने खळबळ..

छत्रपती संभाजीनगर : रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्ता कैलास पवार तीन तासांपासून पोलिस स्टेशनमध्ये बसूनही तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांकडून केवळ चौकशीचं आश्वासन दिलं जात असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे
दरम्यान, नगरपालिकेच्या लेआऊटमध्ये रस्ता नसतानाही प्लॉट नंबर 48 मधून रस्ता काढण्याचे आदेश आमदार बोरनारे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयाला कैलास पवार यांनी आक्षेप घेतला आणि लेआऊट नकाशा तपासण्यास सांगितलं. यामुळे आमदार चिडले आणि त्यांनी शिवीगाळ करत पवार यांना धमकी दिली, असा दावा आहे.
कैलास पवार यांच्या म्हणण्यानुसार, तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे, तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवणार, अशी धमकी आमदारांनी दिली. या घटनेनंतर त्यांनी वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. मात्र, स्थानिक पोलिस आमदाराच्या दबावामुळे तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. फक्त चौकशी करून निर्णय घेऊ, अशी उडवाउडवीची भूमिका पोलिस घेत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. घटनेचा व्हिडिओ अथवा साक्षीदार असतील का, याचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आमदार रमेश बोरनारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नागरिकांच्या अर्जानुसार अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. घटनास्थळी नकाशा पाहताना पवार आले आणि त्यांनी अरे-तुरेची भाषा केली. त्यामुळे वाद निर्माण झाला,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मात्र, मारहाण किंवा धमकीबाबत त्यांनी स्पष्टपणे काही नाकारलेलं नाही.