रोहित आर्य प्रकरणात मोठी अपडेट ; केसरकरांसह आरए स्टुडिओला गेलेल्या मराठी सेलिब्रिटींचीही चौकशी होणार?

पुणे : पवईमध्ये ऑडिशनला बोलावून सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा फास आवळला आहे. रोहित आर्या याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. चार ते पाच दिवसांमध्ये ‘आर. ए. स्टुडिओ’ला भेट दिलेल्या आणि रोहितने बोलवलेल्या मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील कलाकारांनाही चौकशीला सामोर जाव लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुलांच्या मुलाखती सुरू असताना अभिनेते गिरीश ओक यांनी स्टुडिओला भेट दिली होती. एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही भेट दिल्याची माहिती आहे. तर रुचिता जाधव हिच्यासह आणखी काही कलाकारांना रोहितने स्टुडिओत येण्यासाठी संपर्क साधला होता. स्टुडिओला भेट देणाऱ्या, या कालावधीत रोहितने संपर्क साधलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान पवईच्या महावीर क्लासिक इमारतीमधील आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्या याने १७ मुलांसह २० जणांना ओलिस ठेवले होते. त्यांची सुटका करण्यासाठी स्टुडिओत शिरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहितवर गोळी झाडली. छातीत गोळी लागल्याने रोहितचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात आता आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

