मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जवळचा माणूस सोडणार साथ? जाणून घ्या..

छत्रपती संभाजीनगर : राजकारण तोंडावर आले असून राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्यानं अंबादास दानवे चांगलेच नाराज झाले आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एक-दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात तशी चर्चा आता सुरू झाली आहे. अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत, त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे.
शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी जिल्ह्यात मोठा भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं. ते त्यांनी अंबादास दानवे यांनाच उद्देशून म्हटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. खैरे आणि दानवे यांचा वाद आता मातोश्रीवर पोहोचला आहे. काल मातोश्रीवर स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोघांशीही चर्चा केली, मात्र मार्ग निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायानं महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शहरात महाविकास आघाडीचा महाराष्ट्रभीमान मेळावा पार पडला, या मेळाव्यात मुख्य बॅनरवर दानवे यांचा फोटो देखील नव्हता, त्यामुळे चर्चेला उधाणा आलं आहे.