मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल खरेदीवरील निर्बंध हटणार; १ जुलैपासून नवा नियम लागू

मुंबई : आखाती देशांतील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांत जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. त्याचा फटका भारतालाही बसला होता. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाल्याने महागाई वाढली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही तात्पुरते निर्बंध लागू केले होते.

मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत असून इंधनाचा पुरवठा पूर्वपदावर येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत व्यावसायिक इंधन खरेदीवरील तात्पुरते निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ जुलैपासून देशभर लागू होणार असून त्यामुळे उद्योग-व्यवसाय क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी निश्चित मर्यादा लागू करण्यात आली होती. या मर्यादेपेक्षा अधिक इंधन खरेदी करण्यास निर्बंध होते. मात्र नवीन निर्णयानुसार आता पेट्रोल पंपांवरून व्यावसायिकांना कोणत्याही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूक, बांधकाम, औद्योगिक आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांतील इंधन पुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. तसेच पुरवठा साखळीवरील ताण कमी होऊन उद्योगांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, आखाती प्रदेशातील तणाव काही प्रमाणात कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातही सुधारणा होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत.
दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबतही घडामोडी वेगाने सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दोहा येथे इराणसोबत बैठक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र इराणने अशा कोणत्याही चर्चेचे वृत्त फेटाळले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाली असली तरी भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. देशात २५ मेपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.