दिवाळीच्या काळात पुणेकरांना मोठा दिलासा; गुरुवारची पाणीकपात रद्द, महापालिकेची घोषणा

पुणे : दिवाळीच्या सणादरम्यान पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात दर गुरुवारी लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात उद्या, १२ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना उद्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. शहरातील पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२६ पासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.
मात्र, आता गुरुवारच्या नियोजित पाणीकपातीला स्थगिती देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या शहरातील नागरिकांना नेहमीच्या वेळेनुसार पाणी मिळणार आहे.

पाणीकपात रद्द झाल्याने नागरिकांना पाण्याचा अतिरिक्त साठा करण्याची गरज भासणार नाही. सणासुदीच्या काळात महापालिकेच्या या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

का लागू करण्यात आली होती पाणीकपात?
यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्यासाठी दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर तो पूर्ववत होण्यासाठी काहीसा वेळ लागत असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसांच्या पाण्याचे नियोजन करावे लागत होते. आता १२ नोव्हेंबरची पाणीकपात रद्द झाल्याने पुणेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
