शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता योजनांच्या अर्जाला लगेच मंजुरी मिळणार, करावे लागणार फक्त एक काम…

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येतो.

मात्र, यापुढे या योजनांसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज राहणार नाही, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच कृषी विभागाकडून मिळणाऱ्या योजनांमध्ये अर्जाची पडताळणी करण्यासाठी याआधी सातबारा आणि 8 अ उताऱ्याची आवश्यकता होती. मात्र, आता शेतकरी ओळख क्रमांक प्रणालीमुळे शेतकऱ्यांची सर्व आवश्यक माहिती ऑनलाईन पद्धतीनेच उपलब्ध होत आहे. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता उरलेली नाही.

दरम्यान, मांढरे यांनी स्पष्ट केले की, काही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया अद्यापही जुन्या पद्धतीने राबवत शेतकऱ्यांकडून सातबारा आणि ८ अ उतारे मागितले होते. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटी दाखवत परत पाठवण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना सुधारित सूचना दिल्या गेल्या आहेत.

महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करता येतो. यंदापासून ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. अर्ज करताना क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची सगळी माहिती यंत्रणेला मिळते.
यामुळे अर्जासोबत सातबारा व ८ अ उतारे अपलोड करण्याची गरज नाही. अर्जाची छाननी सहाय्यक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी करतात. आता ही प्रक्रिया अधिक सुलभ,पारदर्शक आणि जलद होणार आहे.