पंढरपूरात गूढ मृत्यूचे थरारक रहस्य! रेल्वे रुळांवर तरुणाचा मृतदेह, घरासमोर आढळला पाय; घातपाताचा संशय गडद

पंढरपूर : पंढरपूर शहरात एका 24 वर्षीय तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. रेल्वे रुळांवर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर काही वेळातच मृतदेहाचा एक पाय त्याच्या घराजवळ लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने या प्रकरणाला अधिक गूढ वळण मिळाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून मृत्यूमागे आत्महत्या, अपघात की घातपात याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

मृत तरुणाची ओळख रोहित मधुकर कोरे (वय 24) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचा मंगळवारी रात्री काही मित्रांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर तो घराबाहेर गेला आणि रात्री उशिरापर्यंत परतलाच नाही. कुटुंबीय त्याचा शोध घेत असतानाच बुधवारी सकाळी रेल्वे मार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह रोहितचाच असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचा एक पाय त्याच्या घराजवळ लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

रोहितच्या नातेवाईकांनी मात्र हा साधा अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार नसून नियोजित घातपात असल्याचा आरोप केला आहे. वादानंतर काही जणांनी रोहितला धमक्या दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित व्यक्तींनी त्याला फूस लावून रेल्वे मार्गाच्या दिशेने नेले आणि त्यानंतर त्याच्यावर अत्याचार झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक टप्प्यात रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र पुढे समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे पंढरपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून रोहितच्या मृत्यूमागील सत्य काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासानंतरच या रहस्यमय मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.