“आई दिवसरात्र फोनवर बोलायची, बाबांच्या पोटात चाकू खुपसला…”; ६ वर्षांच्या रियांशच्या दाव्याने कानपूर हत्याकांडाला नवे वळण

कानपूर : कानपूरच्या फीलखाना परिसरात गाजलेल्या हत्याकांड प्रकरणात मृत मनीष गुप्ता यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने केलेल्या दाव्यांमुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. घरात घडलेल्या घटनांबाबत चिमुकल्या रियांशने सांगितलेल्या काही गोष्टी सध्या चर्चेचा विषय ठरत असून, पोलिसांकडून त्यांची पडताळणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियांशने चौकशीदरम्यान सांगितले की त्याची आई अनेकदा मोबाईलवर कोणाशीतरी दीर्घकाळ बोलत असे. ती वारंवार इयरफोन लावून तासन्तास संभाषण करत असल्याचे त्याने पाहिले होते. ही बाब आपण आपल्या वडिलांना आणि आजोबांनाही अनेकदा सांगितली होती, असा दावा त्याने केला आहे.
रियांशच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्रीही घरात याच कारणावरून वाद झाला होता. फोनवर सुरू असलेल्या संभाषणावरून आई-वडिलांमध्ये बाचाबाची झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. त्यानंतर रागाच्या भरात आईने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याचा दावा मुलाने केला आहे. प्रथम हातावर वार झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यानंतर पोटात वार करण्यात आला, असे त्याने सांगितले.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दावा म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी चाकू खरेदी केल्याचा. रियांशच्या म्हणण्यानुसार, त्याची आई शहरातील एका मॉलमध्ये गेली होती आणि तेथून चाकू घेऊन आली होती. त्या वेळी तो स्वतःही तिच्यासोबत होता, असे त्याने सांगितले आहे. या दाव्यामुळे तपास यंत्रणांनी संबंधित ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, वडिलांचा मृत्यू आणि आईच्या अटकेबाबत अनभिज्ञ असलेला रियांश सध्या आपल्या आजोबांसोबत राहत आहे. घरात सुरू असलेल्या शोकाकुल वातावरणातही तो सतत “बाबा कधी परत येणार?” असा प्रश्न विचारत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच “आई कधी येणार?” अशी विचारणाही तो वारंवार करत असल्याने कुटुंबीय भावूक होत आहेत.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मनीष गुप्ता यांनी स्वतः पोलिसांना फोन करून हल्ल्याची माहिती दिल्याचा दावाही समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सध्या पोलिसांकडून कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. रियांशने सांगितलेल्या बाबींची सत्यता तपासली जात असून, त्यातून या हत्याकांडामागील नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.