मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांचे कारवाईचे आदेश


पुणे : राजेंद्र हागवणे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेंद्र हागवणे यांना सगळ्या पदावरून काढून टाकण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

यासंदर्भात ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे, असे म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते आणि वैष्णवी हगवणे या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

१६ मे रोजी वैष्णवी हगवणे हिने भुकूम, मुळशी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली असून, पुणे न्यायालयाने २६ मेपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील सध्या फरार असून पोलिसांची पथके त्यांच्या शोधात आहेत.

वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळींनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी घेतली होती. मात्र लग्नानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी झाली, जी वैष्णवीने नाकारल्यावर तिच्यावर मारहाण करण्यात आली.

पोस्टमॉर्टेम अहवालातही तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि गळफासामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केवळ आत्महत्या नव्हे, तर खुनाचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी कलम 498A, 306 व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!