मोठी बातमी! अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळ उतरणार मैदानात, बाजी कोण मारणार?

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदासाठी येत्या दोन नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकला आहे. अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ, आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेसुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आज, शुक्रवारी दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची २ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या वेळी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. या संघटनेच्या अध्यक्षपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व होतं. मात्र आता मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही तरीही या वेळच्या निवडणुकीला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. याआधी अजित पवार यांनी तीन वेळा अध्यक्षपद भूषवलं असताना अजित पवार चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी कसे काय उतरू शकतात, यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार तीन टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार हे कृत्य बेकायदा ठरण्याची शक्यता आहे.

