विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी -बारावी परीक्षेच्या ‘या’ प्रमाणपत्रांची ऑनलाइन सुविधा, राज्य मंडळाचा मोठा निर्णय

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे दहावी आणि बारावी परीक्षेचे द्वितीय गुणपत्रक/प्रमाणपत्र,तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र देण्यासाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. ही सर्व प्रमाणपत्र आता ऑनलाईन देणार असल्याचं राज्य मंडळाचे सचिव डॉ दीपक माळी यांनी स्पष्ट केल आहे.

विद्यार्थ्यांना दहावी-बारावीचे प्रमाणपत्रे विविध कामासाठी गरजेची असतात. परंतु ती हरवली किंवा त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटली तर विभागीय मंडळामध्ये जाऊन त्यांना हेलपाटे मारावे लागतात. परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून ही सर्व प्रमाणपत्रे आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. तसेच द्वितीय गुणपत्रक/ प्रमाणपत्र,तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी यापूर्वीचे सर्व प्रकारचे शुल्क रद्द करण्यात आले आहे. त्यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्यात यावे,मागणी अर्जासाठी स्वतंत्रशुल्क आकारु नये असे देखील मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना यासाठी आधार कार्ड ओटीपी बेस्डच्या आधारे संबंधित प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यासंबंधीची कार्यवाही विभागीय मंडळांना तीन दिवसांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. सद्यस्थितीत 1990 सालापासून इमार्कशीट प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व डाटा उपलब्ध आहे. त्यामुळे 1990 नंतरचे द्वितीय गुणपत्रक/ प्रमाणपत्राची मागणी आल्यास त्याची सॉफ्ट कॉपी अर्जदार तसेच विभागीय मंडळास उपलब्ध होणार आहे. प्रमाणपत्राची मागणी पोस्टाने केल्यास ते स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात येणार आहे.

प्रचलित पद्धतीने द्वितीय प्रमाणपत्रावर संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का, मुख्याध्यापक,प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्यात येत होती.परंतु सद्यस्थितीत ऑनलाईन प्रणाली मध्ये माध्यमिक शाळेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिफारस पत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच ऑनलाईन प्रणालीत एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. तरी याबाबत सर्व माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे देखील मंडळाने स्पष्ट केले आहे.