मोठी बातमी! कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट; PM-Kisan योजनेवर मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : राज्य सरकारने नुकताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्र सरकारनेही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 2030-31 पर्यंत पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासोबतच केंद्र सरकारने इतर काही कृषी योजनांनाही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या PM-Kisan योजनेचे लाभार्थी 24 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर योजनेला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 24 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 23 हप्त्यांद्वारे 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याचा लाभ मिळाला असून, लाभार्थ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांचाही मोठा वाटा आहे.
योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे पुढील पाच वर्षे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM-Kisan अंतर्गत आर्थिक मदत जमा होत राहणार आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासादायक मानला जात आहे.