राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!! ई- बाईक टॅक्सीला मंजुरी, पेट्रोलवरच्या बाईकला रेड सिग्नल…

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
सरकारच्या ई बाईक्सचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. तसेच केवळ इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीच धावणार असल्याचे सांगून पेट्रोल बाईक टॅक्सीला परवानगी मिळणार नसल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर राज्यात ई बाईक धोरण राबविण्यात येणार आहे.
या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळासमोर ई बाईक्सचा प्रस्ताव ठेवला होता. राज्यात प्रामुख्याने सिंगल प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. रिक्षा किंवा टॅक्सी करीता भाडे द्यावे लागत होते, ते न देता आता ई बाईक टॅक्सीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना ई बाईकचा प्रवास कुठेही करता येणार आहे.
तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात असल्याचे प्रामुख्याने सरनाईक यांनी सांगितले. ई रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान द्यायचा प्रयत्न करत असल्याचे सांगत दहा हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे अनेक फायदे होणार आहेत.
यामध्ये 15 किलोमीटरचे अंतर मर्यादित ठेवण्यात आलेले आहे. तसेच ५० बाईक्स एकत्र घेणाऱ्या संस्थेला लगेच परवानगी मिळणार आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील काही निर्णय घेण्यात आले आहेत. नियमामध्ये काही गोष्टी अंतर्भूत करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.