पुणे पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय! आता तरुणींसाठी शाळा महाविद्यालयात तक्रार पेटी…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात तरुणींवर हल्ले, अत्याचार आणि जीवे मारण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे प्रशासन नेमकं करतंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेकदा तक्रार करण्यासाठी तरुणी घाबरतात. त्यामुळे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात तरुणींसाठी खास तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. दर दोन दिवसांनी तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दिली.
तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढवली जाणार आहे. बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार आहे. यामुळे अशा गोष्टींना आळा बसणार आहे.
पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. यापुढे हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो, असा इशारा आयुक्त रितेशकुमार यांनी दिला आहे. दामिनी पथकात संख्या वाढवून २५ करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एक तरुण एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचा जीव घ्यायला निघाला होता. तो तिच्यावर कोयत्याने वार करणार इतक्यात जवळगेने त्या तरुणाला मागे ओढले आणि तरुणीचा जीव वाचवला.
हा थरार सीसीटीव्हीतही कैद झाला. जवळगे हा महाराष्ट्र लोकसवा आयोग परीक्षाचा अभ्यास करतो. तरुणीचा जीव वाचवल्यानंतर जवळगेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. आता पोलीस देखील याबद्दल गंभीर झाले आहेत.