कृषी मंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय! गावागावात शेतकरी मित्र, तरुण शेतकऱ्यांना १८ हजार मानधन


पुणे : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता प्रत्येक गावात ‘कृषी मित्र’ नेमला जाणार असून यामुळे गावागावात शेतीविषयक मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांना योग्य वेळी सल्ला आणि सरकारी योजनांची माहिती मिळावी, म्हणून हा निर्णय घेतलाय.”

राज्यात आधीच ११,५८७ कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ‘आत्मा’ योजनेअंतर्गत शेतकरी मित्र नेमले जाणार आहेत. प्रत्येक गावात एक शेतकरी मित्र असेल आणि तो सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहे. म्हणजे गावातला माणूसच शेतकऱ्यांना मदत करणार, हीच या योजनेची खासियत आहे.

या योजनेत निवड झालेल्या शेतकरी मित्रांना वर्षाला १८,००० रुपये मानधन दिलं जाणार आहे. हे मानधन दर तीन महिन्यांनी मिळणार आहे. सरकारचा विचार आहे की, ही योजना १ जूनपासून लागू करायची. त्यामुळे लवकरच नियुक्ती प्रक्रिया सुरू होणार आहे.

निवड करताना काही अटीही ठरवण्यात आल्या आहेत. वय ४० वर्षांपेक्षा कमी असावं, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण झालेलं असावं, संवाद कौशल्य चांगलं असावं आणि सोशल मीडियाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. शिवाय ३० टक्के महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. अनुभवी, प्रयोगशील आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांना या पदासाठी संधी दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ११,५८७ शेतकरी मित्रांची नियुक्ती जिल्हास्तरावरून केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक भन्नाट संधी ठरणार आहे. गावात बसूनच मानधन मिळणार आणि शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणार, अशी ही योजना आहे.

एकूणच, सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून “आपला माणूस, आपल्याच गावात” या संकल्पनेतून शेतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!