अमली पदार्थप्रकरणी मोठी कारवाई!! नवी मुंबईत दोन पोलिस अटकेत, ​व्हॉट्सअ‍ॅप चॅट बघितली आणि सगळेच हादरले..


मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतील गुन्हेगारांसोबत नवी मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांचे संधान आढळून आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

याप्रकरणी सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी अटक झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या मुलाच्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातच या पोलिसांचा संबंध आढळून आला आहे.फुलकर हा नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलिस ठाण्यात कामाला आहे.

याबाबत माहिती अशी की, नुकतीच नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. चिंचकर यांच्या दोन्ही मुलांचा अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. यामुळे हे प्रकरण गाजले आहे. नवी मुंबईत एका गुन्ह्यात चिंचकर यांचा दुसरा मुलगा धीरज याचा सहभाग आढळून आला होता.

पोलिसांच्या गुन्हे शाखेला धीरजसोबत फुलकर व भालेराव यांचा थेट संबंध असल्याचे समजले होते. त्यांच्यातील व्हॉट्सअप चॅटवरून याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला व गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. नंतर या दोघांना अटक करण्यात आली. तर अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

अमली पदार्थविरोधी कारवाईत ३५३ आरोपींना अटक करून २१ कोटी १३ लाख रु.चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. २०२४ मध्ये तळोजात केलेल्या कारवाईत दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन पाच कोटी ६२ लाख रुपयांचे मेफेड्रोन व कोकेन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांकडून गुप्तता राखण्यात येत असून, या गुन्ह्यात आणखी काही अधिकारीही गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!