भवरापूला दोन एकर कोथिंबिरीवर शेतकऱ्याने फिरविला रोटर ; कांद्यानंतर कोथिंबीरीने आणले डोळ्यात पाणी…!

उरुळी कांचन: राज्यात सध्या कांद्याला बाजारभाव नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आता कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हातबल झाल्याचे पहायला मिळत आहे. हवेली तालुक्यातील भवरापूर येथील प्रगतशील शेतकऱ्याने दोन एकरातील कोथिंबीर पिकावर रोटावेटर ट्रॅक्टर फिरवून पीक मोडीत काढल्याचे समोर आले आहे.

यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शरद काळूराम चौधरी असे त्या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी कोथिंबिरीचे दर घसरल्यामुळे लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.
उसाचे उत्पन्न घटल्यामुळे त्यांनी तो खोडा ऊस मोडल्यानंतर कोथिंबिरीची निवड केली. कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कोथिंबीर पीक घेतले. कोथिंबीर पिक घेण्यासाठी शेताची नांगरणी, मशागत करून कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळेल म्हणून धने पेरले.

सुरुवातीला ४ हजार रुपये किमतीचे दोन पोते रासायनिक खत शेतात टाकले. मात्र त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. यामुळे किमान शेतात खत होईल, या उद्देशाने कोथिंबीरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे. त्यांनी दोन एकर कोथिंबीर ही व्यापाऱ्याला पन्नास हजार रुपयांना दिली. मात्र कांद्याचे जसे बाजार पडले तसेच कोथिंबीरची अवस्था झाली.
