जुगार, मटका, हातभट्टी बंद करा, परप्रांतीयांची पडताळणी तातडीने मार्गी लावा, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचना..

सासवड : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. याबाबत आता जिल्हा ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख यांनी सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना काही सूचना दिल्या आहेत. सासवड या ठिकाणचे दत्तनगर व इतर परिसरातील सुरू असणारे जुगार, मटका, गांजा, चरस, हातभट्टी हे चालत असणारे धंदे त्वरित बंद करावेत. असे आदेश दिले आहेत.
तसेच परप्रांतीय कामगारांची माहिती संकलित करावी. आगामी काळात येणारे गुढीपाडवा, रमजान ईद सणासाठी जातीय सलोखा ठेवावा, वाद विवाद न करता शांतता पद्धतीने सण साजरे करावेत. महिला, मुलींची छेडछाड होणाऱ्या ठिकाणावर निर्भया पथकाद्वारे त्वरित कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
सासवड मधील शाळा, कॉलेज परिसर, एसटी, पीएमटी बस स्थानक या ठिकाणी शाळा सुरू होण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी महिला पोलीस अर्चना पाटील यांच्या दामिनी पथक नियमित पेट्रोलिंग करेल, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. ज्या लोकांकडे परप्रांतीय कामगार आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. जे लोक माहिती देणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, असेही ते म्हणाले.
सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. अशाच प्रकारे गुन्हेगारांना पोसत राहणार का? असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी गुन्हेगार आढळल्यास त्वरित कारवाई करावी, असे आदेश पंकज देशमुख यांनी सासवड पोलीस स्टेशन येथील पोलिसांना दिले आहेत. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, गणेश पाटील, अर्चना पाटील, रुपेश भगत, सासवड मधील नागरिक, यांच्यासह सासवड पोलीस स्टेशन मधील कर्मचारी आदी उपस्थित होते.