मोठी बातमी! बच्चू कडूंची प्रकृती बिघडली, कार्यकर्ते टेन्शनमध्ये, राज्यभरात राजकीय हालचालींना वेग..

मुंबई : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अशातच बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांच्या वजनात तब्बल चार किलो घट झाली असून, रक्तदाबातही वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तरीदेखील बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
तसेच बच्चू कडूंनी हे आंदोलन केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक न्यायासाठी असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. “शेतकऱ्यांचं दु:ख जातधर्म पाहत नाही, ते फक्त अन्याय ओळखतं. आम्ही मरण पत्करू पण मागे हटणार नाही,” असं ते म्हणाले.
दरम्यान, राज्यभरातून या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते बच्चू कडू यांच्या पाठिशी उभे राहत आहेत. विशेषतः शरद पवारांनी बच्चू कडूंशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. याशिवाय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे देखील आज त्यांच्या भेटीला जाणार आहेत.
बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय केवळ मंदिरात पुण्य कमवून सुटत नाही, असं खवळून त्यांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) या पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्तेही आंदोलनस्थळी दाखल होत असल्याने, या आंदोलनाच्या राजकीय परिणामांचा वेध घेतला जात आहे.