एकनाथ शिंदेंना पुन्हा CM करण्याचा बच्चू कडूंचा निर्धार; अमरावतीत शक्तिप्रदर्शनाने वाढली राजकीय उत्सुकता


अमरावती : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच अमरावतीत दाखल झालेल्या बच्चू कडू यांचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले. शहरातून काढलेल्या जंगी मिरवणुकीनंतर चांदूर बाजार आणि परतवाडा येथेही कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. मात्र या स्वागत सोहळ्यापेक्षा कडू यांच्या भाषणानेच राजकीय वर्तुळात अधिक चर्चा रंगली आहे.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना कडू यांनी थेट घोषणा करत एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त केला. “जनतेने मला पराभूत केले नसते, तर मला कोणत्याही नेत्याच्या मागे उभे राहण्याची गरज नव्हती. पण आता मी शब्दाला पक्का असलेल्या नेत्याची निवड केली आहे,” असे सांगत त्यांनी शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. रात्री दोन वाजताही लोकांसाठी उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांनी शिंदे यांचे कौतुक केले.

यावेळी कडू यांनी दिव्यांगांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रालयाचा विशेष उल्लेख करत, “देशात प्रथमच दिव्यांग मंत्रालय उभारण्याची ताकद शिंदे सरकारने दाखवली,” असे म्हटले. शेतकरी कर्जमाफीपासून दिव्यांगांच्या प्रश्नांपर्यंत अनेक निर्णयांमध्ये शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्यावर नाव न घेता टीका करत कडू म्हणाले की, “आम्हाला कुणाशी वैर नको, पण फालतू वादात पडण्याचीही इच्छा नाही.” काही दिवसांपूर्वी तायडे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी संयमित प्रतिक्रिया दिली.

कडू यांच्या या भूमिकेमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली असून, त्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!