Ayodhya Mosque : राम मंदिरानंतर अयोध्येत आता मशिदीचाही मुहूर्त ठरला, जाणून घ्या…
Ayodhya Mosque : श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला.
या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतानाच अयोध्येतील मशिदीबाबत मोठी माहिती समोर येत आहे. अयोध्येत या वर्षीच्या मे महिन्यात मशिदीचीही पायाभरणी होणार असल्याची माहिती ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. अयोध्येतील मशिदीच्या कामावर देखरेख करण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन या विकास समितीची स्थापना केली आहे.
या समितीचे प्रमुख हाजी अरफत शेख यांनी ‘रॉयटर’ला सांगितले, अयोध्येत मे महिन्यापासून भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मशिदीचे काम पूर्ण होण्यासाठी पुढील तीन-चार वर्षे लागण्याची शक्यता आहे. या नियोजित मशिदीसाठी निधी जमा करण्यासाठी क्राउड-फंडिंग वेबसाइटची स्थापना केली जाणार आहे. Ayodhya Mosque
शेख म्हणाले, ‘प्रेषित मुहम्मद यांच्या नावावरून या मशिदीचे नाव ‘मशिद मोहम्मद बिन अब्दुल्ला’ ठेवण्यात येणार आहे. लोकांमधील शत्रूत्व, द्वेष संपवून एकमेकांच्या प्रेमात रूपांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण आपल्या मुलांना आणि लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ही सर्व लढाई थांबेल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.