सावधान पुणेकरांनो! FDAचा ‘इराणी टी कॅफे’ला दणका; कोंढवा-येवलेवाडीतील कॅफेचा परवाना निलंबित, तपासणीत धक्कादायक त्रुटी उघड

पुणे : चहाचे शौकीन आणि खवय्यांसाठी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ‘इराणी टी कॅफे’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत परवाना निलंबित केला आहे. कॅफेच्या स्वयंपाकघरात आणि अन्न साठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत समोर आल्याची माहिती आहे.
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत कारवाई

राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत FDAच्या पथकाने पुण्यातील कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावरील ‘इराणी टी कॅफे’ची अचानक तपासणी केली.
तपासणीदरम्यान कॅफेमध्ये अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच काही मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत FDAने संबंधित कॅफेविरोधात कारवाई केली. पुढील आदेशापर्यंत कॅफेचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, याच मोहिमेअंतर्गत पुणे-पानशेत रस्त्यावरील ‘व्यंकटेश्वरम रेस्टॉरंट’वरही FDAकडून कारवाई करण्यात आली आहे.
प्रसिद्ध हॉटेल्स आणि कॅफेमध्येही अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने, बाहेर जेवण करणाऱ्या ग्राहकांनीही खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.